
बीड प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेलगाव येथून शेकडो मराठा बांधवांच्या उपस्थितीत ते मुंबईकडे रवाना झाले.
या आंदोलनासाठी मराठा बांधवांनी १५ ते २० दिवस पुरेल इतके रेशन सोबत घेतले आहे. “आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या लढ्याला ओबीसी समाजातील काही घटकांचाही पाठिंबा लाभत आहे.
आंदोलकांनी ओबीसी नेते हाके, वाघमारे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली. “मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे,” असे म्हणत त्यांनी या नेत्यांना उद्देशून कठोर शब्द वापरले. ‘एक मराठा लाख मराठा’ आणि ‘जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणांनी आंदोलनाचा उत्साह अधिक वाढवला.
मुंबईकडे निघाल्यानंतर जरांगे-पाटील यांचा पहिला मुक्काम जुन्नर येथे झाला. शहागड येथे त्यांचे क्रेनच्या सहाय्याने भव्य स्वागत करण्यात आले. हजारो मराठा बांधव त्यांना भेटण्यासाठी दाखल झाले होते.
सरकारला इशारा देताना जरांगे-पाटील म्हणाले, “मराठा समाजाच्या कुणबी नोंदी उपलब्ध असून प्रमाणपत्रेही दिली जात आहेत. त्यामुळे सरकारने आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे.” पुढील काळात अटीतटीची लढाई होणार असून, “आरक्षण घेऊनच परत येणार,” असा निर्धार त्यांनी पुन्हा अधोरेखित केला.
गेल्यावेळेप्रमाणेच यावेळीही मराठा समाज ठामपणे जरांगे-पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.