
पूर्णिया/अरारिया बिहार.
बिहारमधील विशेष मतदारयादी फेरपडताळणीच्या (एसआयआर) नावाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मतचोरीचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. “मते चोरू देणार नाही. संविधानाने नागरिकांना समान हक्क दिले आहेत. एसआयआर घटनाबाह्य आहे,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
राहुल गांधी बिहारमधील मतदार अधिकार यात्रेत सहभागी झाले होते. पूर्णिया येथे झालेल्या सभेत व नंतर अरारियात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली.
राहुल गांधी म्हणाले,
“केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करून युवकांच्या रोजगाराच्या संधी हिरावल्या आहेत. आता निवडणूक आयोगाच्या मदतीने गरीबांची मते चोरण्याचा डाव आहे. मात्र ‘इंडिया’ आघाडी बिहारमध्ये हा प्रयत्न हाणून पाडेल.”
मोटारसायकलवरून यात्रा
यात्रेदरम्यान राहुल गांधी व राजद नेते तेजस्वी यादव यांनी पूर्णिया येथे मोटारसायकलवरून प्रवास केला. काँग्रेस व राजदचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रवासादरम्यान एका व्यक्तीने सुरक्षा भेदून राहुल गांधींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला; मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले.
‘इंडिया’ आघाडी एकजूट
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये ‘इंडिया’ आघाडी एकजुटीने काम करत असून निकाल फलदायी ठरतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. “लवकरच सामायिक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल. घटकपक्ष वैचारिक व राजकीय एकात्मतेने एकत्र आहेत,” असे ते म्हणाले.
राहुल गांधींच्या मते,
“बिहारमध्ये एसआयआरची मोहीम ही भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाचा संस्थात्मक प्रयत्न आहे. आम्ही हा कट उघड करून मतचोरी होऊ देणार नाही.”