
सातारा प्रतिनिधी
माण तालुक्यातील हिंगणी गावातून चोरीला गेलेला तब्बल आठ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर केवळ पाच तासांत शोधून काढत म्हसवड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. या प्रकरणात दिवड (ता. माण) येथील धनाजी पुनाजी लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंगणी येथील अनिल विष्णू माने यांचा ट्रॅक्टर (एमएच ११ सीडब्ल्यू ३९८५) मंगळवारी मध्यरात्री अज्ञाताने घराजवळून चोरून नेला. सकाळी ट्रॅक्टरचा पत्ता लागला नाही, तेव्हा माने यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाला सुरुवात केली.
गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या काटेकोर गुप्तहेरगिरीच्या आधारे चोरीत धनाजी लोखंडे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने दिवडसह परिसरात शोधमोहीम राबवून गोंदवले बुद्रुक येथील चिक्कू बागेत लपवून ठेवलेला ट्रॅक्टर जप्त केला.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचारी शहाजी वाघमारे, अमर नारनवर, मैना हांगे, वसीम मुलाणी, विकास ओंबासे, संतोष काळे आदींचा सहभाग होता.