नवी दिल्ली, वृत्तसंस्था
हुंड्याच्या अमानुष मागणीसाठी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करावा लागला. आरोपी विपिन भाटी याने रविवारी पोलीस कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत त्याच्या पायाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ग्रेटर नोएडा येथील सिरसा चौकात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री विपिनला अटक करण्यात आली होती. रविवारी न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार करत त्याला काबूत आणले.
सहा वर्षांच्या मुलासमोर आईला पेटवलं जिवंत
विपिन आणि मृतक निक्की यांचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडून हुंड्याचा दबाव सुरु झाला. माहेरहून पैसे आणावेत, असा तगादा विपिनकडून सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. निक्कीने नकार दिल्यानंतर तिला वारंवार मारहाण करण्यात येत होती.
गुरुवारी झालेल्या वादात विपिनने क्रूरपणे सहा वर्षांच्या मुलासमोर निक्कीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवले. तिचा बचाव करण्याचा प्रयत्न बहिणीने केला, मात्र तो निष्फळ ठरला.
३६ लाख रुपयांचा हुंडा मागणीचा आरोप
निक्कीची मोठी बहीण कंचनने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला. सासरच्यांकडून सतत हुंड्याचा दबाव टाकला जात होता. तब्बल ३६ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याला निक्कीने ठाम नकार दिल्याने तिच्यावर अत्याचार वाढले आणि शेवटी जीव गमवावा लागला.
पोलिसांचा शोध सुरू
ग्रेटर नोएडाचे एडीसीपी सुधीर कुमार यांनी सांगितले की, “मुख्य आरोपीला आम्ही अटक केली होती. मात्र, न्यायालयात नेत असताना त्याने पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असून कठोर कारवाई करण्यात येईल.”


