
पुणे प्रतिनिधी
लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांच्या कार्यकौशल्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा उंचावली असल्याचे गौरवोद्गार पुणे शहराचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी काढले.
केवळ चार वर्षांच्या कालावधीत कानवडे यांनी १५ गुन्ह्यांमध्ये २६ आरोपींना शिक्षा होण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. न्यायालयीन कामकाजातील काटेकोर तयारी, दोषारोपपत्र वेळेत दाखल करणे, साक्षीदार व पुरावे न्यायालयासमोर सादर करणे या त्यांच्या कार्यामुळे खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी यांसारख्या गंभीर प्रकरणांत दोषसिद्धी नोंदली गेली. मार्च २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली असून, फक्त जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत सात गंभीर प्रकरणांत निकाल लागल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्यांचा निरोप समारंभ शनिवारी (ता. २३) झाला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, तसेच पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“कानवडे यांनी जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकता यांचा उत्कृष्ट संगम घडवला. त्यांचे काम पोलिस दलाच्या प्रतिमेला अधोरेखित करणारे आहे,” असे डॉ. शिंदे म्हणाले. या वेळी त्यांच्या हस्ते कानवडे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी भावूक झालेल्या ललीता कानवडे यांनी सहकाऱ्यांचे आभार मानले. नुकतीच त्यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली आहे.