
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला थांबता थांबत नाही. गेल्या आठवड्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. या बदल्यांमध्ये वाशिम, अकोला आणि परभणी जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत, तर दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती महत्वाच्या प्रशासकीय पदांवर करण्यात आली आहे.
बदल्यांचा तपशील
योगेश कुंभेजकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
वर्षा मीना यांची अकोला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
संजय चव्हाण यांची परभणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
भुवनेश्वरी एस. यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती
रघुनाथ गावडे यांची मुंबई येथे अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती
गेल्या काही दिवसांपासून राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल सुरू आहेत. याआधी झालेल्या बदल्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई येथून दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय येथे सचिव म्हणून झाली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांना राज्य कर विभागाच्या विशेष आयुक्तपदी नेमण्यात आले.
तर राज्य करांचे विशेष आयुक्त अभय महाजन यांची बदली कापूस उत्पादक पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली. इगतपुरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी ओंकार पवार यांची नेमणूक जिल्हा परिषद, नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून झाली होती.
राज्यातील या सातत्यपूर्ण फेरबदलांमुळे प्रशासनिक हालचालींना वेग आला असून, आगामी काळात अजून काही महत्त्वाच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.