
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पावसाळा सुरू होताच उघड्या विद्युत तारा, साचलेले पाणी आणि महावितरणच्या निष्काळजीपणामुळे जीवितहानीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. भांडुप परिसरातील पन्नालाल कंपाऊंडजवळ रविवारी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक प्रकारात दीपक पिल्ले या अवघ्या १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घराकडे जात असताना भर पावसात उघड्या विद्युत तारेच्या संपर्कात आला. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असतानाच महावितरणची हाय टेन्शन वायर खुली पडलेली होती. प्रत्यक्षदर्शींनी दीपकला आवाज देऊन इशारा केला होता; मात्र कानात हेडफोन असल्याने त्याला काहीही ऐकू आलं नाही. क्षणातच तो तारेच्या संपर्कात आला आणि प्राणघातक विद्युत धक्क्याने कोसळला.
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, या भागात बराच काळ उघडी वायर पडलेली होती. नागरिक वारंवार इशारे देत होते, त्यामुळे अनेकांचे जीव वाचले होते. मात्र, दीपक दुर्भाग्याने या दुर्घटनेत सापडला. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, तरी एका तरुणाचा जीव गमावावा लागला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचित करण्यात आले. तरीही नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “दर पावसाळ्यात उघड्या तारा जीवघेण्या ठरत असताना महावितरणकडून पुरेशी सुरक्षिततेची उपाययोजना केली जात नाही. आमच्या वारंवार तक्रारी असूनही ही बेपर्वाई सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा पावसाळ्यातील विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावितरणने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.