
मुंबई प्रतिनिधी
मुंबईवर मुसळधार पावसाचा मारा सुरू असतानाच वाहतुकीची कोंडी आणि रेल्वेसेवा ठप्प झाली. पर्याय म्हणून प्रवाशांनी मोनोरेलकडे वळताच भीषण अनुभवाला सामोरे जावे लागले. चेंबूर-भक्तीपार्कदरम्यान मोनोरेल अचानक थांबली आणि आतील प्रवाशांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागला.
🔹चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ अडकलेल्या मोनो रेलमधून, आतापर्यंत सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका केली आहे. उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु आहे.… pic.twitter.com/wWneZaDSDh
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 19, 2025
गंभीर बाब म्हणजे मोनोरेल एका बाजूला झुकलेली होती. एसी आणि लाईट बंद झाल्याने आतील प्रवाशांचा श्वास गुदमरू लागला. भीतीने महिला रडू लागल्या, काही प्रवाशी बेशुद्ध होण्याच्या स्थितीत पोहोचले. साधारण तासभर प्रवाशी आत अडकून पडले होते. शेवटी निराश प्रवाशांनी स्वतःच खिडकी फोडून श्वास घेण्यासाठी हवा मिळवली.
“अशी परिस्थिती आम्हाला मेल करून कशी सांगायची?”
अडकलेल्या प्रवाशांपैकी हरिशंकर यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटलं, “लोकल सेवा बंद आहे हे नैसर्गिक आहे, पण मोनोरेल तर नेहमीच बिघडते. अडकल्यावर तक्रार मेलवर करायला सांगतात, पण आत जीव धोक्यात असताना मेल कोण करणार? हे नियोजनच हास्यास्पद आहे.”
त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला “जर इंजिनला आग लागली असती, तर आम्हाला वाचवण्यासाठी कोणता आराखडा होता? प्रवाशांना मूलभूत सुरक्षा प्रशिक्षण देणंही एमएमआरडीएला शक्य झालेलं नाही.”
प्रवासी अस्वस्थ, एमएमआरडीएवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, काही महिला प्रवासी रडत होत्या, तर इतर त्यांना धीर देत होत्या. बाहेरून सूचना दिल्या जात होत्या; पण बंद खिडक्यांमुळे प्रवाशांना त्या समजतच नव्हत्या. “प्रत्येक वेळी मोनोरेल बिघडते. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम राहतो. एमएमआरडीएने आपल्या व्यवस्थापनात तातडीने सुधारणा केली पाहिजे,” असा एकमुखी संताप व्यक्त करण्यात आला.
मुंबईत प्रवाशांसाठी असलेली मोनोरेल सेवा नेमकी ‘सेवा’ आहे की ‘धोक्याचा सापळा’, असा सवाल या घटनेनंतर पुन्हा एकदा उभा राहिला आहे.