
मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबईत तब्बल ३०० मिमी पाऊस नोंदवण्यात आला असून अनेक भागांत पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली. तर नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश परिस्थितीत आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केले.
फडणवीस म्हणाले,
“गेल्या तीन-चार दिवसांच्या मुसळधार पावसात सुमारे १२ ते १४ लाख एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. पिकांसोबतच जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नांदेडमध्ये अतिवृष्टीचा कहर एवढा होता की, तिथे आठ जणांचा जीव गेला. मात्र, राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
मुंबईतील परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
“मुंबईत काही भागांत ३०० मिमी पर्यंत पाऊस कोसळला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. लोकल सेवा मंदावल्या असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सध्या पाणी ओसरण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
राज्यातील आपत्ती व्यवस्थेबाबत माहिती देताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, NDRF आणि SDRF पथके तैनात करण्यात आली आहेत. “अनेक नद्या इशारा पातळीवर आहेत, तर काही नद्या ती पातळी ओलांडून वाहत आहेत. शेजारील राज्यांसोबत विसर्ग व्यवस्थापनाचा समन्वय साधून परिस्थिती हाताळली जात आहे,” असे ते म्हणाले.
हवामान विभागाच्या इशाऱ्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले,
“बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बेल्ट तयार झाला आहे. तोपर्यंत अतिवृष्टीची शक्यता कायम आहे. त्यामुळे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरांचे ड्रेनेज डिझाइन हे साधारण नॉर्मल पावसापेक्षा केवळ १० टक्के जास्त पावसाला तोंड देण्यासाठी असते. मात्र अतिवृष्टी झाल्यास नैसर्गिक अडचणी निर्माण होतात. त्या कमी करण्यासाठी सरकारकडून दर तीन तासांनी नागरिकांना सतत अलर्ट देण्यात येत आहेत.”
नुकसानभरपाई संदर्भात फडणवीस म्हणाले,
“जिथे जनावरं, घरे वा मानवी जीवितहानी झाली आहे, तिथे जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित मदत देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या नियमांनुसार जिल्हाधिकारी निधी थेट वितरित करू शकतात. शेतीसाठी पंचनाम्याचे आदेश दिले असून शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मदत दिली जाणार आहे.”
फडणवीस यांनी नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे