
मुंबई प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पावसामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी १८ आणि १९ ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून या भागांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या २०० हून अधिक नागरिकांची सुटका सेनेच्या मदतीने करण्यात आली.
कल्याणमधील जय भवानी नगर भागात नेतिवली टेकाडावर भूस्खलन होऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने सेना आणि एनडीआरएफच्या पथकांना तैनात केले आहे.
मुंबईत गेल्या आठ तासांत १७० मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरी आणि बोरिवली परिसरात अवघ्या तीन तासांत ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे शहरातील १४ ठिकाणी पाणी साचले; मात्र वाहतूक केवळ दोन ठिकाणीच खोळंबली. दरम्यान, सकाळी ९.१७ वाजता येणाऱ्या ३.७४ मीटर उंचीच्या भरतीमुळे शहराला दुहेरी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील इतर भागातही पावसाने कहर केला आहे. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. विदर्भात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ८०० गावांवर परिणाम झाला आहे. मराठवाडा विभागात गेल्या पाच दिवसांत सहा जणांचा बळी गेला असून २०५ जनावरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. “पुढील दहा-बारा तास अत्यंत महत्त्वाचे असून स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार दिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.