
मुंबई प्रतिनिधी
सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना उधाण आले असून लोकांना फसवण्यासाठी ते सतत नवनवीन डाव रचत आहेत. आता तर ओटीपीशिवाय (One Time Password) बँक खात्यातील रक्कम गायब करणारा नवा प्रकार समोर आला आहे. ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ या नव्या पद्धतीमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मिस्ड कॉलपासून सुरू होते खेळी
आत्तापर्यंत बहुतेक फसवणुकीच्या प्रकरणांत स्कॅमर्स ओटीपी मिळवून खाते रिकामं करीत होते. मात्र, आता ते एका वेगळ्याच पद्धतीने काम करतात. याची सुरुवात साध्या मिस्ड कॉलपासून होते. नंतर स्कॅमर्स स्वत:ला नोकरीची मुलाखत घेणारे, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजक किंवा ओळखीच्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवरून बोलणारे असल्याचे सांगतात. यानंतर ते कॉल मर्ज करण्यास भाग पाडतात.
कॉल मर्ज होताच समोर क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेचा अधिकारी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. प्रत्यक्षात त्या कॉलमधून दिला गेलेला ओटीपी थेट स्कॅमर्सपर्यंत पोहोचतो आणि क्षणार्धात खात्यातील रक्कम गायब होते.
एनपीसीआयचा सल्ला
* अनोळखी नंबरवरून आलेले कॉल किंवा मेसेजेसकडे दुर्लक्ष करावे.
* कोणीही ओटीपी विचारल्यास तात्काळ फोन कट करून नंबर ब्लॉक करावा.
* फसवणूक झाल्यास तातडीने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधावा.
* अँड्रॉइड वापरकर्त्यांनी फोनमधील स्कॅम डिटेक्शन फीचर सुरू ठेवावे.
नागरिकांसाठी इशारा
हा स्कॅम पूर्वीच्या पद्धतींपेक्षा अधिक धोकादायक आहे, कारण पीडित व्यक्ती स्वत: ओटीपी दिल्याचंही लक्षात घेत नाही. त्यामुळे अनोळखी कॉल आल्यास अत्यंत सतर्क राहणं गरजेचं असल्याचं सायबर तज्ज्ञांचे मत आहे.