
बुलढाणा प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली. जळगाव जामोद तालुक्यातील आडोळखुर्द गावाच्या पुनर्वसन व रस्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला दुर्दैवी वळण लागले. गावातीलच आंदोलक विनोद पवार यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात पूर्णा नदीत जलसमाधी घेतली. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या पवार यांचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला.
राज्यातील महत्त्वाच्या जिगाव प्रकल्पात आडोळखुर्द गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. गावाला थेट रस्ता न देता बाहेरून वळसा घालणारा रस्ता उभारण्याच्या योजनेला ग्रामस्थांचा विरोध होता. महिनाभरापूर्वीच प्रशासनाला जलसमाधी आंदोलनाची सूचना देऊनही दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
सस्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच ग्रामस्थ नदीपात्रात उतरले. प्रकल्प अधिकारी चर्चेसाठी उपस्थित असताना अचानक विनोद पवार यांनी “आमच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नाही” असे म्हणत जलसमाधी घेतली. काही क्षणांतच ते प्रचंड प्रवाहात वाहून गेले.
या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी “सरकारच्या दुर्लक्षामुळेच प्रकल्पग्रस्तांवर असे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येते” असा आरोप करत घोषणाबाजी केली. घटनास्थळी उपस्थित अधिकार्यांशी चांगलीच बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस व दंगा काबू पथक तैनात करण्यात आले.
एनडीआरएफचे पथक रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवत होते. आंदोलनाची पूर्वसूचना असूनही प्रशासनाने वेळेवर खबरदारी घेतली नाही, आंदोलकांना ताब्यात घेतले नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
दरम्यान, आमदार डॉ. संजय कुटे व उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. परंतु, जलसमाधीने पेटलेला रोष शमण्याऐवजी आणखी तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.