
मुंबई प्रतिनिधी
छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना उघड्यावर मारहाण करणारे सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ‘दंड’ न देता उलट सरळ ‘पुरस्कार’च दिला आहे. युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या चव्हाण यांना थेट महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीसपद देण्यात आले असून, या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत विचारले –
“हेच का महाराष्ट्राचे मारामाऱ्या करणाऱ्याला उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचा सरचिटणीस बनवतात?”
घडामोडींचा मागोवा
लातूरमध्ये तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात छावा संघटनेने आंदोलन केले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यांनी पत्ते फेकून निषेध नोंदवला. त्यानंतर सूरज चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घाडगे यांना मारहाण केली. परिणामी त्यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांना थेट पक्षाच्या उच्चपदावर नेण्यात आले.
दमानिया यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले –
“दोन आठवड्यांपूर्वीच या पक्षाने कोर्टात लिहून दिलं होतं की सूरज चव्हाण आमचे पदाधिकारी नाहीत. मग अचानक हा ‘जन सन्मान’ कसा?”
राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या या निर्णयावर जोरदार चर्चा सुरू असून, छावा संघटना आणि अंजली दमानिया यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.