
मुंबई प्रतिनिधी
वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची अखेरची स्वप्ने आता वास्तवात उतरू लागली आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ५५६ हक्काच्या घरांच्या चाव्या वाटपाचा सोहळा पार पडला. स्वप्नपूर्तिच्या या क्षणाचा आनंद रहिवाशांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जरी प्रत्यक्ष ताबा सोमवारपासून सुरू होणार असला तरी, आपल्या नव्या घरात गणेशोत्सव साजरा करण्याची आतुरता प्रत्येकाच्या मनात उसळून येत आहे.
यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात १६ भाग्यवानांना घराच्या चाव्या मिळाल्या. पण उर्वरित रहिवाशांनाही लवकरच आपल्या नव्या स्वप्नातील घराची दारे खुली होणार आहेत. वरळीतील इमारत क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील ५५६ रहिवाशांचे पुनर्वसित इमारतींमध्ये स्थानांतरण निश्चित झाले आहे. सोडतीत ठरलेले मजले, घर क्रमांक आता फक्त एका पावलावर आहेत.
तथापि, ताबा घेण्यासाठी म्हाडाकडून ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर संक्रमण शिबिरातील जागा सोडण्याचे हमीपत्र आवश्यक असल्याने काहींना थोडा उशीर होणार आहे. यामुळे “गणेशोत्सवापूर्वी घर मिळेल का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला आहे.
“धमक्या, शिव्या सहन केल्या, पण विश्वास ठेवलो”
“पुनर्विकासाच्या सुरुवातीला घर रिकामे करण्यास सगळेच घाबरत होते. पण मला म्हाडावर विश्वास होता. सर्वात पहिले घर मी रिकामे केले, त्यावेळी मला धमक्या दिल्या, शिव्या घातल्या, ‘हिला झोपडीही मिळणार नाही’ असं हिणवलं. पण आज माझ्या हक्काच्या ५०० चौरस फुटांच्या घराची चावी हातात आहे. हा आनंद शब्दांत मावणार नाही. यंदाचा गणेशोत्सव नव्या घरातच साजरा करणार.” कृष्णाबाई काळे, रहिवासी
“पतीच्या डोळ्यांतलं स्वप्न… पूर्ण झालं, पण ते नाहीत”
“१९९५ पासून आम्ही पुनर्विकासाच्या गोष्टी ऐकत होतो. माझे पती नव्या घराची स्वप्ने बघत होते. पण २०१४ मध्ये ते गेले. आज चावी मिळाल्याचा आनंद आहे, पण हे घर पाहण्यासाठी ते हवे होते, ही खंत मनाला बोचते.” स्मिता शेट्ये, रहिवाशी
“घर आमचं, कायमचं आमचंच”
“आम्ही १६० चौरस फुटांच्या घरात आयुष्य घालवलं. आता ५०० चौरस फुटांचं घर मिळालं आहे. हे घर आम्ही विकणार नाही, सोडणार नाही. इथेच आमच्या पुढच्या पिढ्या वाढतील.” गणेश राजपूत, रहिवासी
वरळीकरांसाठी हा क्षण फक्त घराचा ताबा घेण्याचा नाही, तर दशकानुदशकं जपलेल्या विश्वासाचा विजय आहे. जुने भिंती, आठवणी आणि संघर्षाच्या सावल्या मागे टाकून आता नवी स्वप्नं, नवे दरवाजे, आणि नव्या आयुष्याची पहाट उघडणार आहे. सोमवारपासून सुरू होणारी ही ताबा प्रक्रिया, वरळीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाणार आहे.