
रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील दिघी येथे रक्षाबंधनाच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली. बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा, एटीएमच्या दरवाज्याचे स्टील हँडल पकडताच, जोरदार विद्युत धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत तरुणाचे नाव भावेश नरेंद्र पोवळे (वय ३०, रा. कुडगाव, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) असे आहे. तो ८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साधारण पावणे सातच्या सुमारास दिघी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आला होता. मात्र, दरवाज्याचे स्टील हँडल पकडताच त्याला प्रचंड विद्युत प्रवाह बसला. तो जागीच कोसळला.
स्थानिकांनी तात्काळ त्याला उचलून प्रथम मोहसिन साळुंखे यांच्या दवाखान्यात, आणि नंतर बोर्ली पंचतन येथील डॉ. साळुंखे यांच्या माऊली हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच भावेशला मृत घोषित करण्यात आले.
या दुर्घटनेनंतर दिघी गावात शोककळा पसरली असून, नागरिकांनी एटीएमच्या देखभालीतील निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. एटीएम व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.
भावेशच्या मृत्यूने पोवळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आईच्या डोळ्यांचा आधार गेलेला असून, गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
या घटनेबाबत दिघी सागरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ. क्र. १२/२०२५) करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेली ही दुर्घटना ‘निष्काळजीपणाचे भयानक रूप’ ठरत असून, विद्युत सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.