
मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलिस दलात शनिवारी सकाळी मोठा धक्का बसला. ACP पदोन्नती नाकारणाऱ्या २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पोलीस ठाण्यांतून उचलबांगडी करून ‘साईड पोस्टिंग’वर बदली करण्यात आली. प्रमोशन नाकारताना ज्यासाठी डावपेच रचले, त्यातील एकही हेतू साध्य न झाल्याने या अधिकाऱ्यांचे सर्व गणित कोलमडले.
गुरुवारीच राज्यभरातील १५६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यात मुंबईतील तब्बल ३० अधिकाऱ्यांचा समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार, शासनाकडे पाठवलेल्या २१५ जणांच्या यादीत मुंबईतील सुमारे ७० वरिष्ठ निरीक्षकांची नावे होती. त्यापैकी २३ जणांनी काही ‘विशेष कारणां’मुळे प्रमोशनला नकार दिला होता. आता त्यांनाच उलट फटका बसला आहे.
यापूर्वी फेब्रुवारीत सेवानिवृत्त होणाऱ्या ६ जणांना, मे महिन्यात ४ आणि जुलैमध्ये आणखी ४ अशा एकूण १४ अधिकाऱ्यांना एसीपी पदावर बढती मिळाली होती. उर्वरित १५६ जणांची पदोन्नतीची घोषणा गुरुवारी झाली.
१) शनिवारी सकाळीच मुंबई पोलिसांनी तीन महत्त्वाचे आदेश जारी केले –
२) एसीपी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचे पोस्टिंग आदेश.
३) प्रमोशन नाकारणाऱ्या २३ वरिष्ठ निरीक्षकांची ‘साईड पोस्टिंग’वर बदली.
४) सेवाजेष्ठतेनुसार पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षकपदी बढती देऊन ५३ रिक्त ठाण्यांत नेमणूक.
यामुळे शहरातील पोलीस ठाण्यांपासून गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागापर्यंत मोठी हालचाल सुरू झाली आहे. ‘साईड पोस्टिंग’वर गेलेल्यांचे चेहरे पडले तर नवी पोस्टिंग मिळालेल्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.