
पुणे प्रतिनिधी
पुणे शहर पुन्हा एकदा विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेने हादरलं आहे. बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या वर्षाच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मूळची राजस्थानची असलेली ही विद्यार्थिनी पुण्यात वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्यास होती. ती तिच्या हॉस्टेलसमोरील एका खासगी खोलीत एकटी राहत होती. बुधवारी सकाळी ती बराच वेळ बाहेर न आल्यामुळे शेजारी राहणाऱ्या मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला. प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. दरवाजा तोडून आत प्रवेश करताच पोलिसांना विद्यार्थिनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
घटनास्थळी तपास करताना पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये “मला अभ्यास करायचा आहे, पण मी करू शकत नाही. मला माफ करा,” असे हृदयद्रावक शब्द लिहिले होते. ही चिठ्ठी पाहताच तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. शोकाकुल वातावरणात आई-वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही विद्यार्थिनी गेल्या काही वर्षांपासून मानसिक समस्यांनी ग्रस्त होती. ती आठवीत असतानाच तिला मानसिक आजाराची लक्षणं दिसू लागली होती. तिला मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडून नियमित उपचार सुरू होते आणि ती औषधांचाही नियमित वापर करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांवर वाढणारा अभ्यासाचा ताण आणि मानसिक आरोग्याची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मन हेलावून टाकणारी घटना… पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर विचार करण्याची वेळ!