
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खबरदारी; १५ हजार लाभार्थींनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत
सोलापूर प्रतिनिधी
राज्य शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ घेत असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. जर लाभार्थ्यांनी त्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेली रक्कम सलग तीन महिने काढली नाही, तर ती रक्कम थेट शासनाकडे परत केली जाणार आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या अनुदान योजना यामध्ये समाविष्ट आहेत.
१५ हजार लाभार्थी अजूनही प्रक्रिया बाहेर
सोलापूर जिल्ह्यात सध्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे एकूण १ लाख ५७ हजार लाभार्थी आहेत, त्यामध्ये दरमहा ५०० नवीन लाभार्थ्यांची भर पडत आहे. मात्र, डिसेंबर २०२४ पासून लाभ ‘डीबीटी (Direct Benefit Transfer)’ प्रणालीद्वारे थेट बॅंक खात्यात जमा होऊ लागल्यामुळे, कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य करण्यात आली आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली असली तरी उर्वरित १५ हजार लाभार्थी अद्यापही या प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. अशा लाभार्थ्यांना लाभाची रक्कम थांबवली जाऊ शकते, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
घरोघरी दिली जात आहेत मंजुरीपत्रे
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील नव्याने मंजूर लाभार्थ्यांना तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन मंजुरीची पत्रे दिली जात आहेत. तसेच त्यांना योजनांसंदर्भात माहिती देऊन ‘डीबीटी’ साठी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
“शासनाच्या निर्देशानुसार, तीन महिने रक्कम न काढल्यास ती बॅंकेमार्फत शासनजमा केली जाते. या नियमांची अंमलबजावणी सुरू आहे.”
– शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर
महत्त्वाचे:
* लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रे संजय गांधी कार्यालयात जमा करणे गरजेचे
* लाभ मिळवण्यासाठी वैयक्तिक खात्यातील व्यवहार नियमित असणे आवश्यक
* रक्कम तिन्ही महिने बॅंकेत पडून राहिल्यास ती शासनकडे परत जाईल
सूचना: लाभार्थ्यांनी विलंब न करता आपले कागदपत्र सादर करून, बँक व्यवहार तपासून योजना लाभ नियमित करून ठेवावा.