
बार्शी प्रतिनिधी
बार्शीत राजकीय वादाला पुन्हा पेट मिळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची चारचाकी गाडी सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना… pic.twitter.com/Ku1pmcq8YE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 31, 2025
या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं,
“जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही, ही म्हण बार्शीत खरी ठरतेय. विधानसभेत पराभूत झालेले रणवीर राऊत यांनी महिनाभरापूर्वी शांताराम जाधवर यांना अश्लील शिविगाळ केली होती. आता त्यांच्या गाडीला आग लावली गेली आहे. उद्या त्यांच्या घराला आग लागली किंवा कुणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण?”
याप्रकरणी पवारांनी थेट राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत सवाल केला की,
“गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर गृहखातं देणार का? पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पाहत आहेत का?”
शांताराम जाधवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.