
रत्नागिरी प्रतिनिधी
चिपळूण शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका नवविवाहित दाम्पत्यानं वशिष्ठी नदीत एकत्रित उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
नीलेश रामदास अहिरे आणि अश्विनी अशी या दोघांची नावे असून, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आज सकाळी गांधेश्वर मंदिराजवळील पुलावर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, या घटनेचा काही भाग स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, अश्विनीचा पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नीलेश हा मूळचा धुळे जिल्ह्यातील असून, मागील आठ वर्षांपासून चिपळूणमध्ये वास्तव्य करत होता. त्याची चिपळूण शहरात मोबाइल शॉपी आहे. तो पागे परिसरात भाडेपट्टीने राहत होता.
आज सकाळी नीलेश आणि अश्विनी हे दोघे मोटरसायकलवरून गांधेश्वर पुलावर आले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावर दोघांमध्ये काही वेळ वाद झाला. त्यानंतर दोघे थोडा वेळ तेथून निघून गेले, मात्र काही वेळाने पुन्हा पुलावर येत त्यांनी एकाच वेळी नदीत उडी मारली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, एनडीआरएफच्या पथकाकडून दोघांचा शोध सुरू आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.