
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कराड शहरात सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. नुकताच साखरपुडा झालेल्या 26 वर्षीय तरुणीने कृष्णा नदीच्या पुलावरून थेट नदीत उडी घेत आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26) असं या दुर्दैवी तरुणीचं नाव असून तिच्या या कृत्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना वाघमारे दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली होती. तिने काही वेळ मोबाईलवर कोणाशी तरी संवाद साधला आणि नंतर क्षणार्धात गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून थेट नदीत उडी मारली. हे पाहून पुलावर उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली, पण तोपर्यंत ती नदीत बुडाली होती.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पुलावर कल्पनाची दुचाकी आणि तिची बॅग आढळली. त्यात ओळखपत्र, पर्स आणि इतर वैयक्तिक साहित्य होते. त्यानंतर कल्पनाच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं. बॅग पाहताच नातेवाईकांनी तिची ओळख पटवली. तरुणीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होताच तिच्या आईने हंबरडा फोडला, तर वडिलांना तीव्र धक्का बसला. आईची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.
विशेष म्हणजे, कल्पनाचा साखरपुडा दोन दिवसांपूर्वीच पार पडला होता आणि लवकरच तिचं लग्न ठरणार होतं. मात्र नेमकं काय घडलं, यामुळे तिने असे पाऊल उचलले याबाबत अजूनही गूढ कायम आहे. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.
दरम्यान, कल्पना वाघमारे कराडमधील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती. तिचा मोबाईल कॉल रेकॉर्ड, शेवटचा कॉल कोणाला केला होता याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
अंधारामुळे सोमवारी रात्री शोधमोहीम थांबवण्यात आली होती. मात्र मंगळवारी सकाळपासून एनडीआरएफ पथक, पोलीस आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. अद्यापपर्यंत तिचा मृतदेह सापडलेला नाही.
ही घटना प्रेमसंबंध, कौटुंबिक दडपण की अन्य कोणत्या कारणामुळे घडली, याचे उत्तर मिळेपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.