
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील तब्बल 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता असून, आगामी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी ‘सणासुदीची भेट’ ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो, मात्र तो आता दोन टक्क्यांनी वाढून 55 टक्के होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय 31 जुलै 2025 पर्यंत निर्गमित केला जाईल, असा दावा माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा?
केंद्र सरकारने मार्च 2025 मध्येच आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% पर्यंत वाढवला होता. ही वाढ मागील जानेवारीपासून लागू करण्यात आली. त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारी 2025 पासून वाढीव दराने भत्ता देण्याची तयारी शासनाकडून सुरू आहे.
याचा अर्थ, महागाई भत्त्यातील फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच मागील सहा महिन्यांचा थकबाकी भत्ता एकरकमी दिला जाण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात निर्णय नाही, कर्मचाऱ्यांत नाराजी
30 जून ते 18 जुलै 2025 दरम्यान पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र महागाई भत्ता वाढीबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती.
सध्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्णयाची शक्यता वर्तवली जात असून, शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे.
पेन्शनधारकांनाही होणार फायदा
महत्वाचे म्हणजे, या निर्णयाचा फायदा फक्त सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच नाही, तर राज्य सरकारचे पेन्शनधारक सुद्धा या वाढीच्या लाभार्थी ठरणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी ही बातमी दिलासादायक ठरणार आहे.