
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणावाचे संबंध आणि वादग्रस्त भूमिका लक्षात घेता आगामी क्रिकेट सामन्यांवर अनिश्चिततेचे सावट होते. पण आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) थोडं नरम झाल्याने आणि आशियाई क्रिकेट परिषदेकडून (ACC) प्रयत्न झाल्याने आशिया चषकाच्या आयोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
* ८ ते २८ सप्टेंबरदरम्यान दुबई किंवा अबुधाबी येथे स्पर्धा
* भारत, पाकिस्तानसह एकूण ८ संघ स्पर्धेत सहभागी
* WCL सामन्यातून भारताची माघार, पण आता सकारात्मक पाऊल
* BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला बैठकीला व्हिडीओद्वारे सहभागी
ढाका येथे २४-२५ जुलै रोजी ACC ची बैठक आयोजित करण्यात आली असून, भारताने या ठिकाणी बैठक होण्यास पूर्वी विरोध केला होता. मात्र, आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भारताची भूमिका काहीशी मवाळ झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारताच्या माघारीमुळे स्पर्धा धोक्यात
WCL मालिकेतील IND vs PAK सामना भारतीय खेळाडूंनी खेळायला नकार दिल्याने रद्द करण्यात आला होता. त्यामुळेच आगामी आशिया चषकाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु, भारताच्या नरम भूमिकेमुळे ACC च्या नियोजनाला गती मिळाली आहे.
सहभागी संघ:
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान (ACC सदस्य)
ओमान, युएई, हाँगकाँग (ACC प्रीमिअर चषक विजेते)
केंद्र सरकारचीही ‘हिरवा कंदील’
काही दिवसांपूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी “भारत-पाकिस्तान सामन्याला हरकत नाही,” असे स्पष्ट केल्याने स्पर्धेच्या आयोजनाला हिरवा सिग्नल मिळालेला होता. यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका टळणार?
PTI च्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशिया चषकातून सुमारे ३४.८ कोटी रुपये तर अन्य ICC मालिकांमधून २३.३१ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. भारताने स्पर्धेवर बहिष्कार टाकल्यास पाकिस्तानला मोठ्या महसूलावर पाणी फिरण्याची शक्यता होती.