
नवी दिल्ली वृत्तसंस्था
२००६ मध्ये मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष ठरवण्यात आलेल्या १२ आरोपींच्या सुटकेवर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने बुधवारी स्पष्ट टिप्पणी केली — “पण घाई काय आहे?”
सुनावणीदरम्यान गवई म्हणाले, “८ जण आधीच सुटले आहेत. निर्दोष सुटकेला स्थगिती ही ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ घटनांमध्येच दिली जाते.”
तत्पूर्वी मंगळवारी, केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणातील *”गंभीरते”*कडे लक्ष वेधत याचिकेची तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ती मान्य करत गुरुवारी (आज) याचिकेची लिस्टिंग करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयात पुन्हा उपस्थित राहून याचिकेत काही तांत्रिक त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंबई उच्च न्यायालयाने काही निरीक्षणे हिंदी भाषेत नमूद केली असून ती दुरुस्त केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या वकिलांचे प्रतिपादन होते की, “ही सुटका ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपात मोडते आणि आम्ही न्यायालयाला त्याबाबत पटवून देऊ.”
मुख्यमंत्र्यांची तीव्र प्रतिक्रिया
मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “धक्कादायक” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
“ज्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्यांच्या सुटकेने सामान्य माणसाच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे,” असे म्हणत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाचा निर्णय : ‘पुरावे ठोस नाहीत’
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाचा निकाल रद्द करताना स्पष्ट केले की, “आरोपींनी गुन्हा केला हे सिद्ध करण्यात सरकारी वकील पूर्ण अपयशी ठरले.”
यात विशेषतः एटीएसकडून आरोपींवर कथित छळ झाल्याचे आणि तपासावर तत्कालीन दबाव असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
पार्श्वभूमी
११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ७ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ८०० जण जखमी झाले.
ट्रायल कोर्टाने २००९ मध्ये ५ जणांना फाशी, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता, त्यातले एक आरोपी मृत झाला असून उर्वरित १२ जणांची सुटका झाली आहे.