
नाशिक प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यात आज सकाळी भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढदिवसाच्या आनंदात सहभागी होऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या गांगुर्डे कुटुंबावर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या वणी रोडवर घडली.
ही घटना कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील वणी रोडवर घडली. अल्टो कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कारतील सात जणांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
धडकेत कार नाल्यात उलटली; पाण्यात बुडून मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गांगुर्डे कुटुंबिय नाशिक येथे नातेवाइकाच्या मुलाच्या वाढदिवसाला हजेरी लावून परतीच्या प्रवासात होते. मात्र वाटेत वणी रोडवर मोटारसायकल आणि अल्टो कारमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुरडून गेला आणि नंतर कार थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात जाऊन उलटली.
या अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर पडता न आल्यामुळे आणि त्यांच्या तोंडात नाकात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सात जणांचा मृत्यू; दोन जण जखमी
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे:
देविदास पंडित गांगुर्डे (वय २८, रा. सारसाळे)
मनीषा देविदास गांगुर्डे (वय २३, रा. सारसाळे)
उत्तम एकनाथ जाधव (वय ४२, रा. कोशिंबे)
अल्का उत्तम जाधव (वय ३८, रा. कोशिंबे)
दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय ४५, रा. देवपूर, देवठाण)
अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय ४०, रा. देवपूर, देवठाण)
भावेश देविदास गांगुर्डे (वय २, रा. सारसाळे)
जखमींची प्रकृती गंभीर
या भीषण अपघातात मंगेश यशवंत कुरघडे (वय २५) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय १८) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांमध्ये शोककळा; माजी नगराध्यक्षांनी घेतली भेट
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.