
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील आगामी महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल, असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही जनतेचा कौल महायुतीला मिळेल, असे ते म्हणाले.
मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात बीड, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, नाशिक आणि जालना या पाच जिल्ह्यांतील विविध पक्षांच्या नेत्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये माजी नगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख आदी स्थानिक पातळीवरील नेत्यांचा समावेश आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
राज्यातील नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष अनंत चिंचाळकर, वशिष्ठ सातपुते, रामदास ढगे, संदीप माने, शिवाजी सावंत यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधील डॉ. जे. के. जाधव, बाबा उगले, डॉ. परमेश्वर गुट्टे, मंगेश जाधव यांनीही पक्षप्रवेश केला. पंढरपूरमधील राम भिंगारे, श्रीनिवास उपळकर, औदुंबर गंगेकर आणि प्रशांत कोकरे यांचाही समावेश होता.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथून रामकृष्ण खोकले, सुनिता जाधव, गणेश कदम, कल्पना ठोंबरे या सरपंच आणि पाच उपसरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर जालना जिल्ह्यातील सरपंच योगिता मुळे आणि उपसरपंच शेख मुकर्रम शेख नुर यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल होण्याची घोषणा केली.
शिवसेनेत वाढता जनसमर्थनाचा ओघ
“शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढत आहे. सर्वसामान्य बहिण-भावंडांसह शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले. त्यामुळेच आज शिवसेनेच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढतो आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्था ही थेट कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढवली जाणारी निवडणूक असल्याने येथे महायुतीचाच विजय होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.