
मुंबई प्रतिनिधी
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी आणि मराठी माणसांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांनी ठाम आणि तितक्याच धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या खास ठाकरे शैलीत, उद्धव ठाकरेंनी दुबेंना जशास तसे सुनावत शिवसेनेचा ‘मराठी इंगा’ दाखवला.
“हा कोण लकडबग्गा? ना लांडगा, ना कुत्रा! त्याला ओळखतं तरी कोण?” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशिकांत दुबेंची खरडपट्टी काढली. “त्यांना लकडबग्गा म्हणण्याचीही लायकी नाही”, असा खवळलेला इशाराही त्यांनी दिला.
दुबे यांनी अलीकडेच एका भाषणात म्हटलं होतं की, “भाषेवरून मारहाण करायची असेल तर तमिळ, तेलुगू, उर्दू लोकांनाही मारा. आमच्या पैशावर तुम्ही जगताय.” यावर उद्धव ठाकरेंनी रोखठोक उत्तर दिलं, “तुम्ही कोणता टॅक्स देता? आणि कोणाचं पोट भरता?” असं विचारत त्यांनी दुबेंना ‘तरस’ असा उल्लेख करत त्यांचा खरपूस समाचार घेतला.
“मराठीसाठी लढणाऱ्यांना दहशतवादी म्हणणं ही विकृती!”
मनसे कार्यकर्त्यांनी एका उत्तर भारतीय व्यापाऱ्याला मराठी येत नसल्यामुळे फटकारल्याच्या घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसैनिकांची तुलना पहलगाममधील दहशतवाद्यांशी केली होती. यावरही उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
“मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना अतिरेक्यांशी करणं म्हणजे मराठीचा घोर अपमान आहे. अशी तुलना करणाऱ्यांनी स्वतःला आरशात बघावं. खरे मराठी मारेकरी हेच लोक आहेत,” असा घणाघात ठाकरे यांनी केला.
“भाजपकडून महाराष्ट्रात आग लावण्याचं राजकारण!”
“आज भाजपा फक्त तोडाफोडीच्या राजकारणावर उरली आहे. घरं पेटवायची आणि त्यावर आपलं राजकारण भाजायचं, हा त्यांचा उद्योग आहे. पण आता तो उद्योग बंद होणार आहे,” असा इशारा देत ठाकरे म्हणाले, “मी आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे यांचं तापलेलं आहे, हे स्पष्ट आहे.”
फडणवीसांच्या ‘रुदाली’ वक्तव्यावरही चपखल उत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्र कार्यक्रमाला ‘रुदाली’ असे संबोधले होते. यावरही प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले,
“फडणवीसांची मानसिकता हीच आहे. खऱ्या भाजपचा खून या लोकांनीच केला आहे. त्यामुळे आता तेच ‘रुदाली’ करत आहेत. त्यांनी भाड्याचे उरबडवे नेमले आहेत आणि त्या ‘रुदाली’चा तमाशा सध्या सुरू आहे.”
उपसंहार : ‘मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही!’
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून स्पष्ट झाले की, मराठी अस्मितेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही. आणि या लढ्यात राज ठाकरेही बाजूला उभे आहेत, हे चित्र अधिक ठळक होत आहे.