
मुंबई प्रतिनिधी
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येत सरकारला घाम फोडणारा झणझणीत इशारा दिला आहे. वरळी डोममध्ये आयोजित विजयी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आले, आणि महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेवर ठाम भूमिका मांडली.
“मराठी आलीच पाहिजे!” – गुजराती समाजाला राज ठाकरेंचा स्पष्ट संदेश
“महाराष्ट्रात राहायचं, व्यापार करायचा, नोकरी करायची, पण मराठी येत नसेल तर ते स्वीकार्य नाही,” असं ठामपणे सांगत राज ठाकरे यांनी म्हणलं, “गुजराती असो, इतर कोणी असो – मराठी आलीच पाहिजे यात वाद नाही. पण जर जास्त नाटकं केली, मुद्दाम टाळाटाळ केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे!”
सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांची गर्जना उसळत असताना राज ठाकरेंनी आणखी एक पाऊल पुढे टाकत स्पष्ट केलं – “चूक त्यांची असली पाहिजे. उगाच कोणाला मारायचं नाही. पण आपल्या हक्कासाठी, आपल्या भाषेसाठी जर कोणी टिंगल करत असेल तर त्याला उत्तर दिलंच पाहिजे.”
“जात-पात आणि भाषेचं राजकारण सरकार करतंय” – ठाकरेंची सरकारवर घणाघाती टीका
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यास शासनाला भाग पाडल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन संयम आणि आक्रमकतेचा अनोखा संगम दाखवला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “या देशात भाषावार प्रांतरचना झाली ती त्या भाषेच्या लोकांसाठी. पण सरकारचं पुढचं राजकारण तुम्हाला जातीत विभागण्याचं आहे. ते तुम्हाला पुन्हा मराठी म्हणून एकत्र येऊ देणार नाहीत.”
“मारणारा सांगत नाही – मार खाणारा सांगतो!”
“मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीत समोरचा व्यक्ती गुजराती निघाला म्हणजे मी मुद्दाम मारलं असं होत नाही,” असं स्पष्टीकरण देत त्यांनी हिंदी चॅनेल्सवरही टीका केली. “अशा घटनांचे व्हिडीओ काढू नका,” असं सुचवत त्यांनी पुढे म्हटलं, “आपल्यातच त्यांना समजलं पाहिजे. मारणारा सांगत नाही – मार खाणारा सांगतो.”
‘मराठीचं बाळकडू हेच आमचं खरं बाळकडू’
राज ठाकरे यांनी त्यांच्या एका गुजराती मित्राचं उदाहरण देत भाषिक सलोख्याचा संदेशही दिला. “नयन शहा नावाचा माझा गुजराती मित्र आहे. तो इतकं सुंदर मराठी बोलतो की, शिवाजी पार्कला फिरताना तो कानात हेडफोन लावून पु. लं. ऐकतो,” असं सांगत त्यांनी भाषेला आत्मसात करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.
या विजयी मेळाव्यात केवळ हिंदी सक्तीविरोधात आवाज उठवण्यात आला नाही, तर ठाकरे बंधूंची मराठीसाठीची आक्रमकता आणि एकजूट पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आली. पुढचं रण आता भाषेच्या आणि अस्मितेच्या भूमिकेतून लढलं जाणार, हे स्पष्ट झालं आहे.