
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई |वडाळा पूर्व येथील हुसेन दर्गा परिसरात संशयाच्या नशेत एका तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
वडाळा टी.टी. पोलिस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार, जुनेद मुन्नू खान उर्फ चिना (२४, रा. टिटवाळा, ठाणे) असे आरोपीचे नाव असून, त्याने शाहरुख (पूर्ण नाव अद्याप अस्पष्ट) या व्यक्तीवर धारदार लोखंडी हत्याराने सपासप वार केले. “तू माझ्या बायकोसोबत संबंध ठेवतोस का?” असे म्हणत त्याने शाहरुखच्या गळ्यावर, चेहऱ्यावर, उजव्या हातावर व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले.
ही घटना बुधवारी (२ जुलै) सायंकाळी साडेपाच वाजता हुसेन दर्गा शेजारी फाल्गुनी बिल्डिंगच्या जवळ घडली. फिर्यादी दादापीर हुसेनसाब तलवाई (६६) यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंभीर जखमी झालेल्या शाहरुखला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.