
मुंबई प्रतिनिधी
राज्य शासनाने आता शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यावर पूर्णपणे आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयीन वेळेत ‘हॅपी बर्थडे’ म्हणत केक कापताना दिसले, तर त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या आधारे शासनाने यासंदर्भात कठोर परिपत्रक जारी केले असून, कार्यालयीन वेळ आणि जागा ही “नागरिकांच्या सेवेसाठी” असून, ती वैयक्तिक उत्सवांसाठी नाही, असा ठणकाव प्रशासनाने केला आहे.
शासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, सेल्फी काढणे, फोटोसेशन किंवा व्हिडिओ शूटिंग करणे आता बंदीच्या कक्षेत आले आहे. या प्रकारांमुळे कार्यालयात आलेल्या नागरिकांचे काम खोळंबत असून, त्यामुळे तक्रारींचा भडका उडत आहे.
शासनाने स्पष्ट केलं आहे की, नियम क्र. ४, ५ आणि २२ अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध, पारदर्शक व लोकाभिमुख वर्तन अपेक्षित आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय चौकशी, समज, लेखी तक्रार, पदोन्नती रोखणे, निलंबन किंवा सेवासमाप्ती यांसारखी कारवाई होऊ शकते.
राज्यभरातील सर्व विभागप्रमुखांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कामाच्या वेळेत उत्सवाच्या नावाखाली कार्यालयात चालणारा गोंधळ आणि नागरिकांची होणारी गैरसोय आता थांबणार असल्याचे संकेत मिळत आहेत.