
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | कांदिवली परिसरातील एका आलिशान गगनचुंबी इमारतीत बुधवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले. केवळ १४ वर्षांच्या मुलाने रागाच्या भरात ५७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील सिद्धा सिब्रूक या उच्चभ्रू निवासी संकुलात राहणारा हा मुलगा प्रसिद्ध गुजराती मालिका अभिनेत्रीचा एकुलता एक अपत्य होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याच्या आईने त्याला ट्युशनला जाण्यास बजावले. मात्र त्या कारणावरून तो संतापला. रागाच्या भरात त्याने थेट बाल्कनीतून खाली झोकून देत आपले जीवन संपवले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली.
कुटुंबीयांबद्दल समजते की, मुलाची आई गुजराती टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करते. ती पतीपासून विभक्त होऊन सध्या एका चित्रपट क्षेत्रातील पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वीच हे कुटुंब या उंच इमारतीत स्थलांतरित झाले होते.
या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अल्पवयीन मुलाने एवढे टोकाचे पाऊल उचलावे, यामुळे परिसरातील नागरिकही सुन्न झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.