
नवी दिल्ली प्रतिनिधी
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘RailOne’ नावाचे नवीन सुपर ॲप लाँच केले आहे. रेल्वे प्रवासाशी संबंधित सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणारे हे ॲप प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ आणि जलद बनवणार आहे. यामुळे आता तिकीट बुकिंगपासून ते ट्रेनचे थेट ट्रॅकिंग, पीएनआर तपासणी, तक्रारी, फीडबॅक आणि इतर अनेक सेवा एका क्लिकवर मिळणार आहेत.
‘रेलवन’ (RailOne) हे ॲप ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’ (CRIS) या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले असून, ते अँड्रॉईड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या डिजिटल परिवर्तनाचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
प्रवाशांसाठी कोणकोणत्या सेवा मिळणार?
RailOne ॲपद्वारे प्रवाशांना आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटे बुक करता येणार आहेत. प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी, ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, कोच स्थान माहिती, पीएनआर तपासणी आणि मदत सेवा या साऱ्याचा समावेश ॲपमध्ये करण्यात आला आहे. यामुळे यापुढे प्रवाशांना विविध सेवा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करण्याची गरज भासणार नाही.
शस्मार्ट फिचर्सची रेलचेल
R-Wallet सुविधा : रेल्वेच्या ई-वॉलेटचा समावेश, बायोमेट्रिक वा mPIN लॉगिनची सोय.
आधार/डिजीलॉकर पडताळणी : तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लवकरच ओळख पडताळणी बंधनकारक होणार.
हाय परफॉर्मन्स सिस्टम : दर मिनिटाला १.५ लाख तिकिटे बुक करण्याची क्षमता, ४० लाख प्रकरणे हाताळण्याची ताकद.
जुन्या युजर्ससाठीही फायदेशीर
RailConnect आणि UTSonMobile वापरणारे युजर्स देखील RailOne वर त्याच लॉगिन क्रेडेन्शियल्ससह प्रवेश करू शकतात. यामुळे त्यांना नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही.
नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ
नवीन युजर्ससाठी फक्त मोबाईल नंबर व OTP द्वारे लॉगिन करण्याची सोपी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. हे ॲप Google Play Store आणि Apple App Store वर मोफत उपलब्ध आहे.
भारतीय रेल्वेच्या या पावलामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक गतिमान, सुलभ व विश्वासार्ह ठरणार आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत रेल्वे सेवा आणखी अद्ययावत होत जाणार असून, ‘RailOne’ हे ॲप भविष्यातील ‘स्मार्ट रेल्वे सिस्टम’चे सर्वोत्तम उदाहरण ठरेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.