
नवी दिल्ली प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक क्रांतिकारी आणि उपयोगी फीचर सादर केलं आहे. ‘AI Summarize’ असं या नव्या फीचरचं नाव असून, या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणताही महत्त्वाचा मेसेज वाचल्यावाचून राहणार नाही, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
सुरुवातीला हे फीचर अमेरिका आणि काही निवडक देशांमध्ये सुरू करण्यात आलं असून, लवकरच ते इतर देशांमध्येही विस्तारण्याची योजना असल्याचे सांगण्यात आलं आहे.
काय आहे हे ‘AI Summarize’?
‘AI Summarize’ फीचर युजरच्या व्हॉट्सअॅपवरील सर्व न वाचलेले मेसेज — वैयक्तिक तसेच ग्रुप — एका छोट्या सारांश स्वरूपात दाखवते. यामुळे प्रत्येक मेसेज स्वतंत्रपणे उघडून वाचण्याची गरज भासत नाही. संपूर्ण संभाषणाचा सारांश करून महत्त्वाची माहिती एका क्लिकवर समजते आणि युजरला तात्काळ निर्णय घेता येतो की कोणत्या मेसेजला प्राधान्य द्यायचे आहे.
या तंत्रज्ञानामागे ‘Private Processing’ नावाची सुरक्षित प्रणाली वापरली जात असून, हे Trusted Execution Environment (TEE)वर आधारित आहे. त्यामुळे मेसेजचा सारांश आणि युजरचा डेटा पूर्णपणे गोपनीय राहणार असल्याची ग्वाही कंपनीने दिली आहे. व्हॉट्सअॅप किंवा मेटाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला यामधील माहिती वाचता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्तरांचे सजेशनही मिळणार
याप्रमाणेच काही मेसेजेससाठी AI स्वयंचलितपणे उत्तरांचे पर्यायही सुचवेल. विशेष बाब म्हणजे हे सजेशन पाहण्यासाठी मेसेज उघडण्याची गरज भासणार नाही. विशेषतः व्यस्त दिनक्रम असलेल्या युजर्सना हे फीचर मोठा दिलासा देणारे ठरणार आहे.
सध्या ही सेवा फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध असून, अमेरिकेतच प्राथमिक टप्प्यात सुरु करण्यात आली आहे. मात्र लवकरच इतर देश आणि भाषांमध्येही हे फीचर सुरू करण्याचा मेटाचा मानस आहे.
जगभरात ६० कोटींहून अधिक भारतीय युजर्स असलेल्या व्हॉट्सअॅपसाठी हे फीचर महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या उपक्रमामुळे व्हॉट्सअॅप केवळ एक संवादमाध्यम न राहता, स्मार्ट डिजिटल सहाय्यकाच्या रूपात अधिक सक्षम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तर आता ‘AI Summarize’च्या मदतीने व्हॉट्सअॅपवर येणारा कोणताही महत्त्वाचा मेसेज तुमच्या लक्षात न येण्याची शक्यता नाही, हे नक्की!