मुंबई प्रतिनिधी
मुंबई |मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘काँटा लगा गर्ल’ म्हणून घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी निधन झाले. कार्डिअक अरेस्टमुळे तिने जगाचा निरोप घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी रात्री शेफाली जरीवालाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना अंधेरीतील बेलव्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता, असे रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने सांगितले.
यावेळी तिच्यासोबत पती पराग त्यागी आणि इतर काहीजण उपस्थित होते. तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पत्रकार विकी लालवानी यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
लालवानी यांनी म्हटले आहे की, “रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यूला दुजोरा दिला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.” डॉ. विजय लुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने तिच्या चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. अभिनेत्री राजीव अदातिया, अली गोनी यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
#ShefaliJariwala Singer #MikaSingh gets emotional after shefali's sudden demise. pic.twitter.com/T4QWa4djXS
— Rohan Sharma (@Rohan167_) June 27, 2025
२००२ साली आलेल्या ‘काँटा लगा’ या गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे शेफाली रातोरात स्टार बनली होती. हे गाणे डीजे डॉल यांनी रिक्रिएट केले होते आणि टी-सिरीजने प्रदर्शित केले होते. त्यानंतर तिने ‘नच बलिये’, ‘बिग बॉस १३’ यांसारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.
शेफालीचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. वडील सतीश जरीवाला आणि आई सुनीता यांच्या ती लाडकी मुलगी होती. २०१४ मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीशी विवाह केला होता.
सध्या या घटनेविषयी अधिकृत निवेदन किंवा तिच्या कुटुंबाकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.


