सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू होऊन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येतील. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता अर्जांची छाननी होणार असून ६ ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ते २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचाराला वेग येणार असून १ नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. ३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक काम पाहणार आहेत.
संचालक मंडळाच्या २१ जागांमध्ये विविध प्रवर्गांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या प्रतिनिधींसाठी ११ जागा, महिलांसाठी दोन जागा, तसेच अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी प्रत्येकी एक जागा आहे. उर्वरित जागांवर प्रक्रिया व इतर पतसंस्थांच्या प्रतिनिधींमधून संचालकांची निवड होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण २०१९ मतदार असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली आहे.
जिल्हा बँकेवर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यंदा भाजपकडूनही सहकार क्षेत्रात प्रभाव वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे वृत्त आहे. शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आपले पारंपरिक वर्चस्व कायम राखण्यासाठी तयारी सुरू आहे. सर्वपक्षीय पॅनेलच्या हालचालीही सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणुकीचे प्रत्यक्ष चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.


