
मुंबई प्रतिनिधी
राज्यात शालेय शिक्षणात लागू करण्यात आलेल्या त्रिभाषा सूत्रातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात आता जनआंदोलनाचे स्वरूप घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 29 जून रोजी दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आले असून, त्यांना या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीने केले आहे.
26 जून रोजी ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या जाहीर सभेच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, तसेच शालेय शिक्षण अभ्यास व कृती समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यानंतर उद्धव ठाकरे आणि दीपक पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर सभेची घोषणा केली.
या सभेच्या निमित्ताने राज्य सरकारने घेतलेल्या त्रिभाषा सक्तीच्या निर्णयाची आणि संबंधित परिपत्रकाची प्रतीकात्मक होळी करण्यात येणार आहे, अशी माहिती दीपक पवार यांनी दिली. या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, भाकपचे नेते प्रकाश रेड्डी, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.
या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. समितीने पाठवलेल्या पत्रात एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटले आहे की, “मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या पुढाकाराने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात शालेय शिक्षण अभ्यास व कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीकडून 29 जून रोजी आयोजित जाहीर सभेला आपण उपस्थित राहावे, अशी आग्रहाची विनंती करण्यात येत आहे. आपल्या पक्षातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांनाही या पत्राद्वारे आमंत्रण दिले जात आहे.”
या जाहीर सभेसाठी शिक्षक, पालक, समन्वय समितीतील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या या सभेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.