
नवी दिल्ली प्रतिनिधी
देशातील कोट्यवधी प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 1 जुलै 2025 पासून वेटिंग तिकिटांवर मर्यादा लागू केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयानुसार, आता एकूण आसन क्षमतेपैकी केवळ 25 टक्के जागांवरच वेटिंग तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे लांबलचक प्रतीक्षा यादीवर आळा बसणार असून, कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (PM) शिवेंद्र शुक्ला यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. देशभरातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये आणि सर्व श्रेणींमध्ये हा नियम लागू होणार आहे. प्रवाशांना यासंदर्भातील माहिती एसएमएस, रेल्वे पोर्टल, स्टेशनवरील डिजिटल डिस्प्ले आणि सार्वजनिक घोषणांद्वारे दिली जाणार आहे.
अपंग, जवान आणि पोलिसांसाठी विशेष सवलती
या नव्या धोरणात अपंग प्रवासी, कॅन्सर व गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती, व्हीलचेअर वापरणारे, लष्कर व निमलष्करी दलांचे जवान, पोलिस आणि वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत असलेले प्रवासी यांना प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठीही सवलतीचा विचार करण्यात आला आहे. या सवलती ऑनलाईन आणि काउंटर दोन्ही माध्यमांतून मिळणार आहेत.
चार्ट तयार झाल्यावरच मिळणार कन्फर्म तिकिट
सध्याच्या पद्धतीप्रमाणे, ट्रेनचा पहिला चार्ट सुटण्याच्या सुमारे चार तास आधीच (जर जागा उपलब्ध असेल तर) कन्फर्म तिकीट दिले जातात. मात्र, अनेकदा ही माहिती वेळेवर मिळत नाही आणि प्रवाशांना तिकीटाच्या अनिश्चिततेतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करू न शकणाऱ्या प्रवाशांना काउंटरवरूनच तिकीट घ्यावे लागणार आहे.
दलालांची सक्रियता कमी होणार
पूर्वी वेटिंग तिकिटांवर कोणतीही स्पष्ट मर्यादा नसल्याने दलाल आणि एजंट यांचा प्रभाव वाढला होता. आता मर्यादित वेटिंगमुळे ही अडचण दूर होणार असून, अधिक पारदर्शक आणि प्रवाशांना अनुकूल व्यवस्था तयार होणार आहे.
तिकीट ट्रान्सफरचे नियम कायम
तिकीट ट्रान्सफर करण्यासंदर्भातही काही विशिष्ट नियम आहेत. वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जोडीदार यांसारख्या जवळच्या नातेवाइकांनाच तिकीट ट्रान्सफर करता येईल. तसेच सरकारी अधिकारी, शैक्षणिक सहलीवर असलेले विद्यार्थी किंवा अधिकृत गटांना ग्रुप बुकिंगमधील तिकिटे ट्रान्सफर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
रेल्वेच्या या नव्या पावलामुळे देशभरातील सामान्य प्रवाशांपासून ते विशेष गरजा असलेल्या प्रवाशांपर्यंत सर्वांना दिलासा मिळणार आहे. प्रत्यक्ष प्रवासापूर्वीच कन्फर्म तिकीटाची उपलब्धता सुनिश्चित केल्याने रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.