
मुंबई प्रतिनिधी
चर्चगेट-विरार महिला विशेष लोकलमध्ये घडलेल्या हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. १७ जून रोजी मिरा रोड आणि भाईंदर दरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणात एक महिला रक्तबंबाळ झाली असून, व्हिडीओ समोर आल्यानंतर वसई रेल्वे पोलिसांची भूमिका गंभीरपणे प्रश्नचिन्हांत आली आहे.
जखमी कविता मेदाडकर (वय ३१) या विरारच्या फूलपाडा भागात राहतात. त्या मिरा रोडहून विरारकडे जाण्यासाठी लोकलमध्ये चढत असताना, दरवाजात उभ्या असलेल्या २१ वर्षीय ज्योती सिंगसोबत त्यांचा वाद झाला. शाब्दिक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि ज्योतीने मोबाईलने कविताच्या डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर काहीच कारवाई न करता, पोलिसांनी “तक्रार नाही” म्हणत प्रकरण मिटवले. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची दखल घेतली जाऊ लागली. कविता मेदाडकर यांनी पुढे येत पोलिसांवर गंभीर आरोप केले. “माझं डोकं फुटलं होतं, रक्त वाहत होतं… तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट ५ हजार रुपयांची तडजोड करायला लावली,” असा ठपका त्यांनी ठेवला.
या आरोपांमुळे वसई रेल्वे पोलिसांवर टीकेची झोड उठली. मनसे कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत प्रकरणाचा जाब विचारला, त्यानंतर पोलिसांनी हलवळ दाखवत शनिवारी दोघींना चौकशीसाठी बोलावलं.
शेवटी, ज्योती सिंग विरोधात प्राणघातक हल्ला, शांतता भंग आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यामुळे लोकलमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांवर तातडीने आणि कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.