
मुंबई प्रतिनिधी
ठाण्यातील सामान्य नागरिकांचे ‘स्वतःच्या घराचे स्वप्न’ लवकरच साकार होणार आहे. म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण) कोकण मंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील शिरगाव आणि खोणी भागात तब्बल ६२४८ घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक घरे अवघ्या १९ लाख ११ हजारांपासून १९ लाख २८ हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असणार आहेत.
शासकीय धोरणांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) व मध्यम उत्पन्न गटातील (MIG) कुटुंबांना हे स्वस्त दरातले घरे उपलब्ध होणार आहेत. घरांच्या किमतीत कपात करण्यात आली असून, या योजनेचा थेट लाभ गृहस्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांना होणार आहे.
शिरगाव व खोणीतील घरांचे दर कमी
ठाण्यातील शिरगाव येथील ५२३६ घरे केवळ १९.२८ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असून, खोणी येथील घरांचा दर सुमारे १ लाखाने घटवून १९.११ लाख रुपये इतका करण्यात आला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
अर्जासाठी डेडलाईन नाही
या योजनेसाठी कोणतीही अंतिम मुदत ठेवण्यात आलेली नाही. संपूर्ण घरे विकली जाईपर्यंत योजना सुरू राहणार असल्याचे म्हाडा कोकण मंडळाच्या अधिकारी रेवती गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोण अर्ज करू शकतो?
म्हाडाच्या नियमानुसार,
EWS (अतिदुर्बल घटक) : वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत
LIG (अल्प उत्पन्न गट) : वार्षिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत
MIG (मध्यम उत्पन्न गट) : वार्षिक उत्पन्न ९ ते १२ लाखांपर्यंत
HIG (उच्च उत्पन्न गट) : वार्षिक उत्पन्न १२ लाखांपेक्षा अधिक
अशा गटांतील नागरिकांना या योजनेंतर्गत घरे मिळू शकतील.
दिवाळीत बंपर लॉटरी
म्हाडाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाच हजार नव्या घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून, संबंधित घरे मुंबईतील विविध भागांमध्ये असतील, असे संजीव जयस्वाल यांनी एप्रिल महिन्यातच जाहीर केले आहे.
एकूणच, ठाण्यात स्वस्त दरात घर घेण्याचा विचार करत असलेल्या नागरिकांसाठी ही योजना सुवर्णसंधी ठरणार आहे. सरकारच्या घरमालकी धोरणाला चालना देणारी ही लॉटरी सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीची नवी दिशा ठरतेय.