
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा बारावा हप्ता जून महिन्यात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र, काही महिलांना या महिन्यात दीड हजार रुपयांचा मानधन हप्ता मिळणार नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सरकारकडून पात्रतेची काटेकोर तपासणी सुरू असून यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिला अपात्र ठरणार आहेत.
कुणाला मिळणार नाही हप्ता?
राज्य सरकारच्या नियमांनुसार खालील महिलांना यंदाचा हप्ता मिळणार नाही:
वयोमर्यादा अटी: २१ वर्षांखालील तसेच ६५ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना हप्ता नाकारला जाणार.
उच्च उत्पन्न गट: ज्या अर्जदार महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्या अपात्र ठरणार.
शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय: ज्या महिलांचे नातेवाईक सरकारी सेवेत आहेत, अशा महिलांना लाभ नाकारण्यात येणार.
चारचाकी वाहनधारक: ट्रॅक्टर वगळता ज्या घरात चारचाकी वाहन आहे, अशाही महिलांना लाभ मिळणार नाही.
इतर शासकीय योजनांचा लाभ: जे आधीपासून इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, अशाही महिलांना योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार.
अनिवासी महिला: महाराष्ट्राबाहेरील किंवा बनावट पत्त्याने अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
हप्त्याची तारीख कधी?
दरम्यान, अद्याप सरकारकडून १२व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरीही जूनच्या अखेरीस हा हप्ता पात्र लाभार्थींच्या बँक खात्यांवर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिलांना एप्रिल आणि मेचा थकलेला हप्ता देखील यावेळी एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
३,६९० कोटींचा खर्च; निधी दोन टप्प्यात
या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून महिला आणि बालविकास विभागाला सुमारे ३,६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असून तो दोन टप्प्यांत वितरित केला जाईल. सध्या पात्रतेची तपासणी सुरू असून, अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्याची मोहीम सुरू आहे.
‘माझी लाडकी बहिण’ योजना महिलांसाठी दिलासादायक असली, तरी योजनेच्या पात्रता निकषांचे पालन न करणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे लाभ हवे असल्यास संबंधित महिला पात्रतेच्या सर्व अटींची पूर्तता करत आहेत का, याची खात्री करणे गरजेचे आहे.