
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शालेय वेळापत्रक लागू होणार असून, नवे अभ्यासक्रम देखील अंमलात येणार आहेत.
राज्य सरकारच्या 16 एप्रिल 2025 रोजीच्या निर्णयानुसार, नवीन शैक्षणिक धोरण अर्थात ‘न्यू एज्युकेशन पॉलिसी’ यंदापासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जाणार आहे. त्याची सुरुवात पहिलीच्या वर्गापासून होत असून, 2025-26 या शैक्षणिक वर्षात नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिलं जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (SCERT) यांनी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व माध्यमांच्या शाळांसाठी सुधारित शालेय वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 18 जून 2025 रोजी काढलेल्या परिपत्रकाच्या आधारे तयार करण्यात आले आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, वर्षभरातील 365 दिवसांपैकी 210 दिवस अध्ययन-अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी 35 आठवड्यांचा अभ्यासकाल निश्चित करण्यात आला आहे. उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा, मूल्यांकन व सहशालेय उपक्रमांचा समावेश असणार आहे.
विशेष म्हणजे, परीक्षा व संबंधित उपक्रमांसाठी 14 दिवस, तर सहशालेय उपक्रमांसाठी 13 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय रविवारी व इतर नियोजित सुट्ट्यांसह एकूण 128 दिवस शाळा बंद राहणार आहेत.
शालेय वेळेच्या नियोजनामध्ये परिपाठ, मधली सुट्टी व समृद्धीकरण तासिकांमध्ये थोडा बदल असू शकतो, मात्र इतर तासांचा कालावधी एकसंध ठेवण्यात आला आहे. वेळापत्रकात गणित, भाषा, पर्यावरण, आरोग्य शिक्षण व कलाशिक्षण यासारख्या विषयांना समप्रमाणात वेळ देण्यात आल्याने अभ्यासात समतोल राखला जाणार आहे.
या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागेल आणि अभ्यासाचे ओझं न वाटता शालेय जीवन अधिक आनंददायी आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, नव्या अभ्यासक्रमासह एकसंध अभ्यास आराखड्याची अंमलबजावणी केल्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आणि समतोल शिक्षण दिलं जाईल, यावर भर दिला जाणार आहे.