
अमेठी वृत्तसंस्था
‘फादर्स डे’ दिवशी काळजाला घायाळ करणारी आणि अश्रू अनावर करणारी दुर्घटना अमेठी जिल्ह्यात रविवारी पहाटे घडली. वडिलांचा मृतदेह घेऊन मूळ गावी जात असलेल्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात होऊन मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात अमेठीतील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील फिरोजपूर येथे राहणाऱ्या अशोक वर्मा यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला होता. ते मूळचे बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मुलगा राजकुमार वर्मा (वय 26) काही नातेवाईक व मित्रांसह दिल्लीला पोहोचला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावी नेण्यास सुरुवात केली.
रुग्णवाहिकेत राजकुमारसह रवी वर्मा (28), फुलो शर्मा (45), शंभू राय (46), चालक आबिद (28) आणि सरफराज (30) हे सहा जण होते. मात्र अमेठी जिल्ह्यातील पूर्वांचल महामार्गावर त्यांची रुग्णवाहिका भरधाव वेगात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनावर जोरदार आदळली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की काही क्षणांत संपूर्ण रुग्णवाहिका चेंदामेंदा झाली.
अपघातात राजकुमारसह रवी, फुलो, शंभू आणि सरफराज यांचा जागीच मृत्यू झाला. चालक आबिद गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून दरवाजे फोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
पिकअप चालकाने दिली माहिती
पिकअप गाडीचे चालक विजय सिंह यांनी सांगितले की, ते माशांनी भरलेली गाडी घेऊन कानपूरहून सिलिगुडीकडे निघाले होते. महामार्गावर टायर पंक्चर झाल्यामुळे त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्या दरम्यान अचानक 120 किलोमीटर प्रतितास वेगाने येणारी रुग्णवाहिका त्यांच्या पिकअपवर आदळली.
या दुर्दैवी अपघातामुळे एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ‘फादर्स डे’चा दिवस कुटुंबासाठी शोकांतिका घेऊन आला. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.