
सातारा प्रतिनिधी
शाहिरी परंपरेने जनतेचे मनोरंजन करतानाच सामाजिक जागृती, राष्ट्रप्रेम आणि लोकचेतना प्रबळ करण्याचे कार्य केले आहे. स्वातंत्र्य संग्राम असो की संयुक्त महाराष्ट्र चळवळ – शाहिरांनी आपल्या शब्दांच्या तेजाने जनमानस चेतवले. अशा परंपरेच्या जतनासाठी शासन कटिबद्ध असून शाहिरी कलेचे जागतिक पातळीवर सादरीकरण व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे (दादा) भोसले रंगमंचावर पार पडलेल्या तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक निलेश धुमाळ, साहित्य कार्यवाहक शिरीष चिटणीस, प्रतापगड संवर्धन समितीचे सदस्य पंकज चव्हाण, विक्रम पावस्कर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शेलार पुढे म्हणाले, “शाहिरी परंपरेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहिर्जी नाईकांसारख्या शहाऱ्यांमार्फत गुप्त माहिती संकलनाचे कार्यही केले. अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहिरीच्या माध्यमातून लढा दिला. शाहिर साबळे यांनी गायलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत आज महाराष्ट्र गीत बनले, याचा गौरव वाटतो.”
आमदार मनोज घोरपडे यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून राज्य शासनाने लोककलांना दिलेल्या राजाश्रयाचे स्वागत केले. डिजीटल युगात या परंपरा जपण्याची जबाबदारी आपली आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा जिल्हा ही केवळ साहित्य आणि संस्कृतीची भूमी नसून, शाहिरी कलेचे खरे कदरदान येथेच आहेत, असे नमूद करत या परंपरेच्या संवर्धनासाठी महोत्सव उपयुक्त ठरल्याचे सांगितले. “विकास हा भौतिक अंगानेच नव्हे, तर सांस्कृतिक अंगानेही झाला पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात शिरीष चिटणीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत शाहिरी कलेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाहिरी, गोंधळी, करपल्लवी यांसारख्या पारंपरिक कलांचे जतन करणाऱ्या कलाकारांचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आले.