
सातारा प्रतिनिधी
पारधी व कातकरी समाजाच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे सातारा लोकसभा अध्यक्ष व दलित महासंघाचे राज्याध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या वेळी दलित महासंघाचे उपाध्यक्ष अतिश कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. मनिषा चव्हाण, उपाध्यक्षा सौ. सविता कणसे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
“२०२४ मध्येही या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन प्रकल्प अधिकारी पाटील यांनी योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही,” असे चव्हाण यांनी सांगितले.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात, पारधी व कातकरी समाजाच्या कल्याणासाठी सातारा जिल्ह्यात स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
याशिवाय, आदिवासी विभागामार्फत दिला जाणारा पुरस्कार खऱ्या अर्थाने आदिवासी समाजात कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिळावा, तसेच सर्व शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत तत्काळ पोहोचाव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.