
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई : लोकल ट्रेनमध्ये राहून गेलेली साडेचार लाखांची दागिन्यांची बॅग परत मिळाल्याने पुण्याहून आलेल्या प्रवासी महिलेला मोठा दिलासा मिळाला. वडाळा रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ही बॅग तिच्यापर्यंत सुखरूप पोहोचली.
प्राजक्ता बावधने या महिला आपल्या भावासोबत पुण्याहून मुंबईत आल्या होत्या. शुक्रवारी दोघे कुर्ला स्थानकाहून पनवेल लोकलने प्रवास करत मानसरोवर स्थानकात उतरले. काही वेळातच त्यांच्या लक्षात आले की, प्राजक्ता यांची सोन्याचे दागिने असलेली बॅग लोकलमध्येच राहिली आहे. या बॅगेमध्ये सुमारे ४ लाख २३ हजार रुपये किमतीचे दागिने होते.
तेव्हा त्यांनी तातडीने आरपीएफ हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकत नव्हता. अखेर उदय शिंदे यांनी वडाळा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. तोपर्यंत ती लोकल पनवेलहून सीएसएमटीकडे परत निघाली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वडाळा पोलिसांनी तातडीने त्या लोकलचा मागोवा घेतला. महिला अंमलदार तावरे यांनी डॉकयार्ड रोड स्थानकावर तैनात असलेल्या अंमलदार जाधव यांना माहिती दिली. त्यानुसार १९.५३ वाजता सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातील ती बॅग जाधव यांनी शोधून काढली आणि ताब्यात घेतली.
यानंतर प्राजक्ता बावधने यांना वडाळा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि त्यांची दागिन्यांची बॅग त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
पोलिसांच्या या तत्पर कार्यवाहीचे प्राजक्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष कौतुक केले असून, या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये पोलिसांप्रती विश्वास वृद्धिंगत झाला आहे.