
कोरेगाव प्रतिनिधी
सायबर फसवणुकीचा बळी ठरलेल्या सोनम जाधव या तक्रारदारास २५,००० रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात रहिमतपूर पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक कौशल्य आणि प्रभावी न्यायप्रविष्टीनंतर ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत जमा झाली.
२४ मार्च २०२५ रोजी सोनम जाधव यांच्याशी एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. त्याने स्वतःला त्यांच्या वडिलांचा ओळखीचा असल्याचे भासवून, त्यांनी २५ हजार रुपये पाठवण्यास सांगितले असल्याचा बनाव केला. अज्ञात व्यक्तीने तक्रारदारांच्या वडिलांची सर्व माहिती अचूक सांगितल्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवून संबंधित बँक खात्यात रक्कम ट्रान्सफर केली. नंतर तिने वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणत्याही प्रकारची अशी विनंती केल्याचे नाकारले आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर तक्रारदाराने सायबर क्राईम संदर्भात NCCRP पोर्टलवर तक्रार दाखल केली. सदर तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडे तपासासाठी आली. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत संबंधित बँक खात्यांची माहिती मिळवून ती खाती गोठवली. न्यायालयाचे आदेश मिळवून फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम तक्रारदारास परत करण्यात आली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि सायबर विभागाचे दीपक देशमुख यांनी केली.
रहिमतपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नये. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉल्स, लिंक किंवा पैशांची मागणी आल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.