
सातारा प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाने महाराष्ट्राची माती पवित्र झाली आहे, अशा रायगड, पुणे, सातारा व कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची संधी शिवछत्रपती दुर्ग एक्सप्रेसमधून उपलब्ध झाली आहे.
या रेल्वेचा शुभारंभ दि. 9 जून रोजी मुंबईत सकाळी साडेसहा वाजता होणार आहे. पर्यटन प्रकल्पाचे संकल्पक खासदार उदयनराजे भोसले या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधून युवा पिढीला ऊर्जा व प्रेरणा मिळावी या उद्देशाने भारतीय रेल्वेने बुद्ध सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किटमार्फत हा उपक्रम राबवला आहे. यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. भारत गौरव ट्रेनद्वारे प्रवास करणाऱ्या शिवछत्रपतींच्या मावळ्यांना शिवरायांच्या जन्मापासून स्वराज्याचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंतच्या जीवन प्रवास घडला.
या रेल्वेद्वारे पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे. ही भारत गौरव ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 9 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता सुटून दादर, ठाणे येथे थांबा घेईल. कोकण रेल्वेमार्गाने माणगाव येथे रायगड दर्शन करून पुणे येथील लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहिल्यानंतर 11 जूनला शिवनेरी किल्ला व त्यानंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर, ज्योतिर्लिंग दर्शन करून दि. 12 जून रोजी साताऱ्यातून प्रतापगड दर्शन झाल्यावर कोल्हापूरात महालक्ष्मी दर्शन आणि किल्ले पन्हाळा दर्शन करेल. त्यानंतर रात्री आठ वाजता मुंबईकडे प्रयाण करणार आहे .
नव्या पिढीसाठी स्वागतार्ह उपक्रम
शिवरायांचा धगधगता इतिहास, त्यांचे जीवन कार्य चरित्र आणि अलौकिक वारसा पर्यटनाच्या माध्यमातून आजच्या पिढीला पाहायला मिळावा हा या ट्रेनचा उद्देश आहे. मराठा साम्राज्याचा गौरव आजच्या पिढीला दाखवणे गरजेचे आहे, असे खासदार उदयनराजे भोसले सांगत असतात. त्यांच्या या भावनेचा आदर करत रेल्वेने या शिवछत्रपती दुर्ग एक्सप्रेसला मान्यता दिली आहे.
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशन यात्रा पॅकेजसह ऐतिहासिक स्थळांची भेट असा हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे, असे मत रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य श्रीनिवास डुबल यांनी व्यक्त केले आहे. शिवछत्रपती दुर्ग एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासासाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत, यामुळे या रेल्वेचे साताऱ्यासह ठिकठिकाणी जंगी आकर्षण राहणार आहे .