
बंगळूरु वृत्तसंस्था
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आयपीएल 2025 च्या विजयाच्या जल्लोषात जे काही घडलं, ते संपूर्ण देशाला सुन्न करून गेलं. आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर चाहत्यांनी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत जल्लोष केला, पण गर्दी अनियंत्रित होताच चेंगराचेंगरी झाली आणि काही क्षणांत 11 निष्पाप जीवांनी प्राण गमवला. तर ३० हून अधिक जखमी झाले आहेत.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Visuals from outside Chinnaswamy Stadium, where the slippers and shoes are scattered. A stampede occurred here, claiming the lives of 11 people and injuring 33 people. pic.twitter.com/5DBhW9IFli
— ANI (@ANI) June 4, 2025
चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर फुटपाथवर शेकडो चपला, बूट आणि सँडल्सचा खच पडलेला होता. कुणी घाईघाईत पायातील चप्पल सोडून धावत गेले, तर कुणाच्या पायातले बूट चेंगराचेंगरीत हरवले. पण सगळ्यात अधिक हृदयद्रावक दृश्य होतं. एका चिमुकल्याच्या पायातली हिरव्या रंगाची सँडल. ती सँडल तिथे पडलेली होती. हे दृश्य पाहून खरंच डोळे पाणावले. आता या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, आणि हजारो लोकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.
दुर्घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप
सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, पोलिसांकडून संपूर्ण तपास सुरू आहे. पण चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. एकीकडे भाजपने राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केला.