
पाटण प्रतिनिधी
मृत्यू हा अटळ आहे मात्र खेळता खेळता मृत्यू येणे हे मनाला चटका लावणारं दुःख आहे.
पाटण तालुक्यातील देशपांडेवाडी, किसरुळे येथील 18 वर्षीय शुभम सुरेश कदम या तरुणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली मृत्यू झाला. या घटनेने कोयना खोऱ्यात हळहळ व्यक्त होत असून, गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
शुभम सायंकाळी ५ च्या सुमारास गावात मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळादरम्यान तो अचानक मैदानात कोसळला. त्याला तातडीने हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शुभम पाटण येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत होता.
तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील अर्धांगवायूने आजारी असून अंथरुणाला खिळलेले आहेत. आई, आजी आणि लहान बहीण यांचा आधार असलेल्या शुभमच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. शुभमच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि उत्साही, खेळप्रेमी स्वभावाने सर्वांना भुरळ घातली होती. त्याच्या आकस्मिक जाण्याने गावकरी, मित्र, शिक्षक आणि शेजारी मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आठवणींनी सर्वांचे मन सुन्न झाले असून, कोयना परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.