
भोर प्रतिनिधी
सातारा महामार्गालगत असलेल्या शिवरे येथील औद्योगिक पट्ट्यातील कारखाने स्थानिकांना रोजगार देण्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहेत. मात्र, शासनाकडून मूलभूत सुविधांचा अभाव आणि विलंबामुळे उद्योग अडचणीत सापडले असून, काही कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत, अशी चिंता उद्योजकांनी व्यक्त केली.
यासंदर्भात आमदार शंकरराव मांडेकर यांनी तातडीने सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीचे आयोजन आणि उपस्थिती
शिवरे येथे आयोजित या बैठकीचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे आणि वेळूचे माजी सरपंच अमोल पांगारे यांनी केले. यावेळी गा-हाणे कंपनीसह अनेक स्थानिक उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीला आमदार शंकरराव मांडेकर, माजी उपसभापती विक्रम खुटवड, शिवसेना नेते अमोल पांगारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष घोरपडे, उद्योजक यशवंत डाळ, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, महावितरणचे उपअभियंता भालचंद्र गवई आणि नवनाथ घाटुळे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, तसेच स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
उद्योगांसमोरील प्रमुख अडचणी
औद्योगिक रस्त्यांचे अपूर्ण डांबरीकरण आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे.
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि भारनियमनामुळे उत्पादनावर परिणाम.
पाणीपुरवठा, दिवाबत्ती, गटारींची देखभाल आणि सार्वजनिक शौचालयांचा अभाव.
औद्योगिक कचऱ्याचे व्यवस्थापन नसल्याने पर्यावरणाचा प्रश्न.
अग्निशमन सुविधांचा अभाव, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
महामार्गावर बसथांबे आणि रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गाची गरज.
तेरा एकर जमीन प्रकरण
कात्रज बोगद्याच्या सातारा बाजूस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) मालकीच्या १३ एकर जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीर प्लॉटिंग करून विक्री केल्याचा गंभीर आरोप अमोल पांगारे यांनी केला. यावर आमदार मांडेकर यांनी अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, परंतु अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत.
आमदार मांडेकर यांचे आश्वासन
“औद्योगिक विकास हा ग्रामीण भागाच्या प्रगतीचा कणा आहे. स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या कारखान्यांचे संरक्षण करणे शासनाची प्राथमिकता आहे. सातारा महामार्गावरील रखडलेली कामे, शिवरे येथील अर्धवट उड्डाणपूल, वीज, पाणी, रस्ते आणि कचरा व्यवस्थापनासाठी NHAI आणि संबंधित विभागांशी तातडीने बैठक घेऊन निधी उपलब्ध करून कामे सुरू केली जातील,” असे आमदार मांडेकर यांनी सांगितले.